पृष्ठे

मंदिर


:- वेळवंडी नदीमध्ये प्राचीन असे पांडवकालीन शिवमंदिर आहे. या मंदिराचे मुळचे नाव कर्महरेश्वर आहे. पण हे मंदिर कांबरे गावाच्या हद्दीत असल्यामुळे कांबरेश्वर नावाने ओळखले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते पांडवकालीन असून पांडवांनी बांधले आहे अशी आख्यायिका आहे. हे मंदिर सध्या वर्षाचे १० महिने धरणाच्या पाण्याखाली असते. मे आणि जून एवढे दोनच महिने ते दर्शनासाठी उपलब्ध असते. पूर्वी धरण नव्हते. मंदिराच्या जागेवर शेती होती. त्या ठिकाणी गावातील एक शेतकरी नांगरणी करत होता. त्याच वेळी अचानक नांगराच्या फाळाला दगड लागल्याचे शेतकऱ्याला जाणवले. पुढे जाऊन तो नांगर घेऊन परत फिरला. त्या वेळी त्याने पहिले की, त्याने नांगरलेल्या भागामध्ये रक्तच रक्त दिसत आहे. तो चमत्कार पाहून तो घाबरला. आणि लगेच औत सोडून घरी आला. कोणालाही काहीही न बोलता रात्री झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शेतकरी शेताकडे गेला. तेव्हा त्याने पाहिले, ज्या ठिकाणी नांगराला दगड लागला होता त्याच ठिकाणी त्याला स्वयंभू शिवलिंग व सध्या अस्तित्वात असलेले मंदिर पाहावयास मिळाले. नंतर ही हकीकत त्याने गावातील लोकांना सांगितली. म्हणजे हे मंदिर किती प्राचीन आहे याची कल्पना येते. दरवर्षी पडणाऱ्या पावसामुळे नदीत पाण्याबरोबर वाहत आलेल्या गाळामुळे हे मंदिर गाडले जात आहे. मंदिराचा पाया व त्यावरीलबांधकाम अजूनही व्यवस्थित आहे. नदीमधील पाण्याच्या लाटांमुळे थोडी मोडतोड झाली आहे. या मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. तसेच पार्वती मातेची मूर्ती व नंदी आहे. या मंदिरात आत जायचे म्हणजे पूर्वी पायऱ्या चढून जावेलागत असे. पण वाहून येणाऱ्या गाळामुळे तिथपर्यंतचा मंदिराचा भाग गाडला गेला आहे. या मंदिराच्या समोर एक नंदी असलेला चौथरा आहे. या चौथऱ्यावर बसायचे असेल तर उडी मारून बसावे लागत असे. पण तो गाळात गाडला गेला असल्यामुळे त्याची आताची उंची फक्त अर्धा ते १ फूट राहिली आहे. या मंदिराच्या कळसाचे व वरील बाजूचे बांधकाम त्या काळचा चुनखडक, वाळू आणि भाजक्या विटा या मध्ये केल आहे. मंदिराच्या भिंतींचे बांधकाम मात्र फक्त दगडामध्ये केले आहे. मात्र हे दगड साधेसुधे नाहीत. आजच्या २० मजुरांना एकत्र येऊन देखील उचलता येणार नाहीत इतके मोठे आहेत. एकविसाव्या युगातील तंत्रज्ञान बुलडोझर, क्रेन ते दगड उचलून त्यांची एकावर एक अशी रचना करेल. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, त्या काळात असले कुशल तंत्रज्ञान कुठून आले? पांडवांनी तेव्हा त्यांच्या कुशल कलाकृती द्वारे चौरस, आयतकृती दगड एकमेकांवर ठेवून त्या मंदिराची रचना केली. ती सुध्दा फक्त एका रात्रीत..... म्हणजे बारा तासात. हे देखील त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. आज आपल्याला एखादे घर अथवा इमारत बांधायची असेल तर तिला कमीत कमी १५ दिवस ते ६ महिने लागतात. पण बघा! हे अतिजड दगडाचे मंदिर पांडवांनी एका रात्रीच्या आत कसे काय उभारले असेल??? या मंदिराच्या आत एखादा शब्द उच्चारला किंवा टाळी वाजवली तर त्याचा प्रतिध्वनी बराच वेळ ऐकू येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा